खेडी (जळगाव) येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘वारकरी भवन’ चे भूमिपूजन
जळगाव जिल्हा वारकरी भवनाला निधीची कमतरता पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
जळगाव दि. ४ – जळगावसारख्या संताच्या भूमीत वारकरी भवन होत आहे. अशा या जिल्हास्तरीय वारकरी भवन बांधकामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जळगाकरांना दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज जिल्ह्यातील खेडी येथे ‘वारकरी भवन’ चे भूमिपूजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
या भूमिपूजन सोहळ्यास ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन,राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार उन्मेष पाटील आणि श्रीमती रक्षा खडसे, आमदार सर्वश्री राजुमामा भोळे, किशोरआप्पा पाटील, चिमणराव पाटील,चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ह. भ. प. गजानन महाराज वरसाडेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
इथे आल्यावर वारकरी संप्रदाय भेटला आणि मनाला खुप आनंद झाल्याचे सांगून आज उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या ‘वारकरी भवन’ चे भूमीपूजन होत आहे. या कामी ज्यांचे ज्यांचे हात लागले त्यांचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आभार मानले.
पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी विकासकामा सोबत अनेक प्रकल्प जिल्ह्यात आणले आहेत परंतू या सर्वात महत्वाचे असे ‘वारकरी भवन’ बांधण्याचा त्यांचा निर्णय अंत्यत चांगला असल्याचे सांगून या ‘वारकरी भवन’ प्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात वारकरी भवन बांधावे असे मुख्यमंत्री यावेळी म्ह्णाले.
आपल्या राज्यात वारकरी संप्रदाय खुप मोठा आहे. तो गावोगावी अंखड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून, त्यातील किर्तनाच्या माध्यमातून अतिशय दुर्गम भागात देखील पांडुरंगाचे नामस्मंरण करुन मोठया प्रमाणात समाज प्रबोधनच काम तसेच जनजागृतीचे काम करीत आहे. पंढरपुरचा विकास होत असतांना राज्यातील जेवढी म्हणून तीर्थक्षेत्र आहेत, त्या सर्व तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचे आमच्या सरकाने ठरविले आहे. विशेष म्हणजे राज्यातील ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात मध्ये अडीच हजार कोटींची तरतुद केली असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
असे आहे प्रस्तावित वारकरी भवन
जळगाव जिल्ह्यातील प्रस्तावित वारकरी भवन ५५ एकरांच्या भूखंडावर होणार असून त्याला सहा कोटी सहा लाख एवढा निधी अपेक्षित आहे. इथले वारकरी भवन इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प ठरणार आहे. या वारकरी भवनास जिल्हा वार्षिंक योजनेच्या नाविण्यपूर्ण योजनेतून 6 कोटी 6 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. एकूण बांधकाम- १८१०.३८ चौ.मी. (तळ मजला) (टप्पा-1) वारकरी भवन पहिल्या टप्प्यात सभामंडप व भक्त निवास इमारत (मुख्य इमारत ) प्रस्तावित आहे.